Sunday, July 3, 2016

समानता

                 
     काही आठवड्यांपूर्वी शनि-शिंगणापूर चौथऱ्यावर महिलांचा प्रवेश या मुद्यावरून बरेच रणकंदन माजले. स्त्री-मुक्तीवाले, सरकार, पोलीस, अन शेवटी कोर्ट! सगळ्या घटना प्रत्येकजण आपापल्या नजरेने बघतील अन अर्थ लावतील. पण कोणीतरी सिंधुताईना या बद्दल विचारले, त्यावर त्या म्हणाल्या “बायकांचे यापेक्षा कितीतरी महत्वाचे प्रश्न आहेत ज्यावर काम करणे गरजेचे आहे!!”.
     एकदम पटलं! देवावर विश्वास ठेवायचा कि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण आपली शक्ती आणि वेळ कोणत्या गोष्टीसाठी खर्च करायचा याचा विचार नक्कीच करायला हवा. समानतेचा आणि स्वातंत्र्याचा मुद्दा कुठे आणि किती ताणायचा ही समज नसलेल्या हुशार लोकांनी स्व-प्रसिद्धी साठी चालवलेलं आंदोलन या पलीकडे त्याला महत्व उरत नाही आणि मूळ मुद्दा तसाच राहतो. खरचं सिंधुताई म्हणतात तसे स्त्रियांचे यापेक्षा कितीतरी महत्वाचे अन गंभीर प्रश्न आज स्त्रीच्या रोजच्या आयुष्यात आहेत.
     या घटना चालू असतानाच अनिल भागवतांचा १२ पुस्तकांचा ‘जीवनसाथ’ चा संच हाती पडला. स्पष्ट आणि समतोल विचारांची आयुष्यभर असलेली साथ म्हणजेच जीवनसाथ ही संकल्पना आवडली. हा संच म्हणजे - रोजच्या आयुष्यातल तत्वज्ञान(applicable philosophy),  समतोल विचार, लग्न, स्त्र-पुरुष संबंध, व्यक्तिमत्व, संस्कार, पालकत्व ...., यासारख्या महत्वाच्या विषयांवर, सोप्या भाषेत पण अत्यंत Practical  असे मांडलेले विचार आणि चर्चा. यात प्रामुख्याने पटलेला विचार म्हणजे स्त्री-पुरुष समानतेचा. खरचं, स्त्री-पुरुष असमनातेबद्दल एका पुरुषाने इतका सूक्ष्म विचार केलेला क्वचितच दिसतो. अनिल सर पुस्तकात म्हणतात तसं –
“स्त्री-मुक्तीची अन समानतेची चळवळ असं नाव असलं तरी ती स्त्रियांच्या उद्धारासाठी नाही तर पुरुषांच्या उद्धारासाठी आहे”.
     या असमानतेच्या वागणुकीला सुरवात स्त्रीच्या जन्मापासून होते अन शेवट अर्थातच मृत्युपर्यंत. पेढे वाटायचे कि बर्फी इथपासून सुरवात अन स्त्रियांनी शक्यतो स्मशानभूमीत जाऊ नये इथे शेवट!! लहानपणी मुलीना वाढवायची पद्धत वेगळी मुलांना वेगळी, मुलांचे अन मुलींचे खेळ वेगवेगळे, मुलीनी शिकायची वाद्ये सुध्दा वेगळी, घरात करायची कामे वेगळी, घरात यायच्या जायच्या वेळांवर बंधने.... यादी संपत नाही. लग्न नंतर तर ही असमानता टोकाला जाते. कमावती बायको हवी, गोरी हवी, प्रेमळ हवी, सुस्वभावी हवी, सुगरण हवी, घरात सगळ्यांचे करणारी हवी J...... परत यादी संपत नाही.
     
     या सगळ्या गोष्टींवर खूप जणांनी बरच लिहिलंय, पण मला त्यातला आर्थिक मुद्दा जरा जास्त महत्वाचा वाटतो कारण तो थेट माणसाच्या आत्मसन्मानाशी जोडला गेला आहे. अर्थार्जन (थोडे कि जास्त याला फारसे महत्व नाही) करणाऱ्या माणसाचा विशेषतः स्त्रीचा आत्मसन्मान नेहेमीच वरच्या स्तरावर असतो. आपण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहोत, परावलंबी नाही ही भावना समानतेच्या दृष्टीने फार महत्वाची आहे. अर्थार्जन अन आर्थिक स्वातंत्र्य याची गल्लत आपण पुरुष बऱ्याचदा करतो. अर्थार्जन करणार बायको हवी पण तिला आर्थिक स्वातंत्र्य द्यायला पुरुष तयार नाही. “आर्थिक बाजू मी बघतो” या वाक्याखाली बऱ्याच गोष्टी दडपल्या जातात. जर का स्त्री कमावती आहे तर त्याचा विनियोग करण्याचे स्वतंत्र्य तिला द्यायला नको का? ‘ घरात किती लागतात तेवढे सांग, बाकी मी  बघतो, हिशोब तुला काय करायचाय?’ हे वाक्य बऱ्याच शिकलेल्या घरातही ऐकू येते. किती पुरुष बँकचा Username, password, ATM card बायको बरोबर share करतात? अपवाद नक्कीच असतील पण फारच थोडे.
     
      या पेक्षा थोडा व्यापक विचार केला तर खरा प्रश्न हा आहे की ‘ शेवटचा शब्द कोणाचा? किंवा अंतिम निर्णय कोणाचा?’. आपल्याकडे उत्तर स्पष्ट आहे- ‘पुरुषाचा’. आधी वडिलांचा नंतर नवऱ्याचा! अंतिम निर्णय फार लांब राहिला, निदान निर्णय प्रक्रियेततरी स्त्रियांना समाविष्ट केले जाते का? स्वयंपाकघर सोडता बाकी किती गोष्टीत तिला ‘Say’ असतो? एकमत असेल तर प्रश्नच नाही पण दुमत असेल तर सर्वसमावेशक चर्चा करून सर्वमान्य असा अंतिम निर्णय घेता का नाही येणार? आजही सुसंस्कृत आणि म्हणवणाऱ्या चांगल्या शिकलेल्या घरात परिस्थिती वेगळी नाही. मागच्या काही दशकांपेक्षा ‘बरी’ असेल पण ‘समाधानकारक’ पातळीच्या जवळपासही नाही. ‘पूर्वी होती असमानता पण आता तसे राहिले नाही’ असे म्हणणाऱ्या पुरुषांनी, उदाहरणादाखल पुढील काही रोजच्या जीवनातील प्रश्नांची उत्तरे स्वतालाच द्यावीत.
१. पाहुणे आल्यावर ‘जरा कॉफी/चहा टाकतेस का’ असे दर वेळी बायकोला सांगतो?
२. मुले असतील तर त्यांच जेवण, आंघोळ, शी-शू बघतो का? मुलांना फक्त १
  आठवडा स्वतंत्रपणे सांभाळता येईल का?
३. माझ्या आई वडिलांशी बायकोने फक्त कर्तव्यबुद्धीने नाही तर प्रेमाने आपुलकीने
   वागले  पाहिजे अशी अपेक्षा असेल तर तिच्या आई वडिलांशी मे तसा वागतो?
४. बायकोचा मित्र चालतो का?
५. घरातली किती कामे स्वताहून करतो? ..............
     प्रश्नांची यादी संपणार नाही पण उत्तर बहुतेक प्रश्नांना नकारार्थीच असेल यात शंका नाही. ही झाली आर्थिक दृष्ट्या सक्षम , शिकलेल्या , शहरी किंवा निमशहरी भागातील परिस्थिती, गरीब किंवा अशिक्षित, खेड्यात राहणाऱ्या स्त्रियांची परिस्थिती  आजही भीषण आहे. बहुतेक सगळेच पुरुष ‘सरपंच-पती’ J

     खरे सांगायचे तर ‘स्वातंत्र्य देतो‘ हा शब्दप्रयोग किती चुकीचा आहे? कोणी कोणाला स्वातंत्र्य द्यायचा प्रश्न येतोच कुठे? ते जन्मापासूनच प्रत्येकाला आहे. पण आज हे समजण्याची आणि योग्य पध्दतीने त्या स्वतंत्राचा वापर करण्याची समज स्त्रियांमध्ये नाही. यातूनच बहुधा स्त्री-मुक्तीचा अतिरेक तरी होतो नाहीतर दुसरे टोक म्हणजे वाट्टेल तो अन्याय स्त्रिया गप्प बसून सहन करतात. गरज आहे ती स्त्रियांनी आपला जन्मसिद्ध अधिकार समजून घेण्याची आणि नंतर त्याचा आत्मसन्मानासाठी वापर करण्याची. पण ही स्वातंत्र्याची समज स्त्रियांमध्ये नसण्याचे मूळ त्यांना वाढवल्या जाणाऱ्या पद्धतीत आहे. मुलगी पिढ्यानपिढ्या जे  घरात बघत आलीये त्याचा पगडा झुगारून देणे सहजसाध्य नक्कीच नाही आणि दुसरीकडे पुरुष सत्ता सोडायला तयार नाही. काहीच न करता जन्मापासून मिळालेली सत्ता कोण सोडेल? घरातले सगळे महत्वाचे निर्णय वडील, भाऊ किंवा नवरा घेताना स्त्री ने खूप पिढ्या पहिले आहे त्यामुळे त्यात काही चूक आहे हेच मुळात तिच्या लक्षात येत नाहीये. आपण निर्णय प्रक्रियेतून डावलले जातोय याची जाणीवच नाहीये. बहुतेक स्त्रियाना पुरुषाच्या पगड्याखाली (Aura) राहायला आवडते म्हणा किंवा तशी सवय नकळत लागलीये म्हणा. लहानपणी बाबा Hero असतो नंतर नवरा. आणि ही भावना इतकी खोलवर रुजालीये की एखादा पुरुष स्त्रीच्या समानतेचा अन स्वतंत्र्याचा आदर करून तशी वागणूक देत असेल तर स्त्रीला तो ‘Husband Material’ वाटत नाही J. तसेच एखादी स्त्री, स्वातंत्र्य अन समानता मागायला लागली की पुरुषाला ती कदाचित मैत्रीण म्हणून आवडते पण ‘बायको Item’  वाटत नाही J. बहुतेक स्त्रियांना फक्त त्यांचा ‘Dictator’ निवडण्याचे स्वातंत्र्य हवे असते. विचित्र आहे पण सत्य आहे.
     
      बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या पेंग्विन पक्षाची विणीच्या हंगामातली (breeding) अचंबित करणारी गोष्ट आहे. या पक्षाची मादी समुद्रकिनाऱ्यापासून बऱ्याच दूरवर अंड घालते. हे अंड उबवण्यासाठी ३०-३५ अंश तापमानाची गरज असते. मादीने अंड घातले की नर हे अंड उबवण्यासाठी, बर्फापासून संरक्षण व्हावे म्हणून स्वताच्या पायात धरून ३-४ आठवडे एकाजागी उभा राहतो. या काळात त्याला पूर्णपणे उपाशी राहावे लागते. तोपर्यंत मादी समुद्रकिनाऱ्यापाशी जाऊन पोटभर अन्न खाऊन येते व नराने उबवलेले अंडे अलगदपणे स्वतःच्या पायावर घेते. मग नर अन्नाच्या शोधार्थ समुद्रकिनारी जातो. अशी सामंजस्याची आणि एकमेकांना पूरक (complimentary) भूमिका माणसापेक्षा कमी बुद्धीमान प्राणी-पक्षी घेत असतील तर आपल्याला घ्यायला काय हरकत आहे?

     
      मला वाटते, आज गरज आहे ती स्त्रियांच्या पण प्रामुख्याने पुरुषांच्या वैचारिक परिवर्तनाची. जो शारीरिक, मानसिक आणि आर्थिक ताकदीने आजच्या घडीला वरचढ आहे त्याच्यावर समजुतदारपणे आणि न्यायप्रियतेने वागण्याची जबाबदारी जास्त नाही का? स्त्रियांनासुद्धा स्त्री मुक्तीचा अतिरेकी मोह आवरायला हवा. संघर्षाची भूमिका घेऊन न्यायालयीन खटले किंवा युद्ध जिंकता येतात पण मतपरिवर्तनासाठी समतोल विचारांची ,सामंजस्याची, आणि प्रबोधनाची गरज जास्त वाटते. एवढ्या मोठ्या परिवर्तनाला वेळ तर लागणारच आहे पण परस्परपूरक भूमिका घेऊन सुरवात तर करायला काय हरकत आहे?